प्रिय बंधु – भगिनींनो,
सस्नेह जय महाराष्ट्र!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक समस्त लोकप्रतिनिधी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर व आपल्या अनमोल पाठिंब्याने मला नगरसेवक म्हणून गत पाच वर्षे आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.
आपल्या आशिर्वादांमुळे व सुचनांच्या अनुसार प्रभागातील नगरसेवक कक्षेतील सर्वांगीण विकासासाठी, रस्ते – पाणी – शौचालय – स्वच्छता – उद्याने इत्यादी विविध नागरी सुविधांच्या संदर्भात मी सातत्याने कार्य करीत आहे तसेच महानगरपालिका सभागृहात केवळ हजेरी न लावता परखड मत मांडुन सूचना करून त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. या कालावधीत अनेक नागरी विकासकामे संपन्न करण्यात यश प्राप्त झाले, काही अजुनही प्रक्रियाधीन आहेत. माहीम येथील एनआयसीयु, कर्नल संतोष महाडीक उद्यान, संत रोहिदस चौक सुशोभीकरण, अनेक चौकांचे नुतनीकरण, साईसुंदर नगर येथील पाण्याच्या समस्येचे निराकरण, अनेक शौचालयांची दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण, सोसायट्यांमधील लादीकरण, ड्रेनेज लाईन्सची दुरुस्ती, प्रकल्पबाधितांच्या घरकुलासंबंधी समस्या निराकरण, अनेक भव्य-दिव्य महोत्सव व क्रीडास्पर्धा आयोजन इ. काही उल्लेखनीय कामे…!
नगरसेवक पदाच्या कालावधीत मुंबई शहर आरोग्य समितीच्या उपाध्यक्ष पदी तसेच जी/साऊथ प्रभाग अध्यक्षपदी माझी निवड झाली, ज्याअन्वये मला अधिक परिणामकारक रित्या कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. आरोग्य समितीवरील कार्यकाळात पालिकेच्या रुग्णालयांना वेळोवेळी वैयक्तिक भेट देऊन तेथील व्यवस्थापन, कर्मचारी व रुग्णांसोबत संवाद साधुन मी सभागृहात त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यास उल्लेखनीय यश देखील प्राप्त झाले. जी/साऊथ प्रभाग अध्यक्ष भूमिकेतुन मी संपूर्ण वॉर्डमधील स्वच्छता मोहिम, सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशमान दिवे योजना, आधुनिक तंत्रज्ञान अंगिकार करुन पारदर्शक व गतिमान कारभार करण्यावर भर दिला.
नागरिकांच्या सुविधेसाठी दोन नवीन उद्याने उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार गत दोन वर्षे सर्व प्रशासकीय स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन क्राऊन मिल कंपाऊंड (एल्फिन्स्टन रोड) येथे ७००० स्क्वेअर फुट चा भुखंड तसेच बिर्ला इस्टेट येथे १ लाख स्क्वेअर फुटचा भुखंड सौंदर्यीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात येण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नजीकच्या काळात प्रभागातील जनतेच्या सेवेत ही दोन्ही उद्याने रुजु होतील. दुखापत झालेल्या खेळाडूंना मनपा रूग्णालयांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यात यावी अशी ठरावाची सूचना मांडली आणि एकमताने मंजूर झाली. केईएम सारख्या रुग्णालयाने याची अंमलबजावणी करण्याची तयारी लेखी अभिप्रायाद्वारे कळवली, हे पाहुन मनस्वी आनंद होतो. अशा स्वरुपाचे अनेक लोकोपयोगी ठराव पालिकेत मांडले आणि आपल्या आशीर्वादाने यशस्वी रित्या त्यांची अंमलबजावणी देखील झाली.
गत २ वर्षांहुन अधिक काळ अवघे जग कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे एका आपत्तीचा सामना करित आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र असल्याकारणे अर्थातच जागतिक आपत्तीचा मोठा फटका आपल्या शहरास बसला. या काळात मी नगरसेवक नात्याने आपल्या वॉर्डमधील जनतेस रेशन (अन्नधान्य) पुरवठा, मास्क (मुखपट्टी) वाटप, सॅनिटायझर वाटप, इमारत / चाळींमध्ये सॅनिटायझर स्टॅन्ड्स वाटप, रस्त्यांवर तसेच इमारतींमध्ये / चाळींमध्ये जंतुनाशक धुम्र फवारणी, रक्त संकलनासाठी रक्तदान शिबिरे, व्यापक प्रमाणावर मोफत लसीकरण शिबीरे अशा विविध उपक्रमांमधुन कर्तव्य बजावत आहे, एक विस्तारित कुटुंब म्हणून आपण वॉर्ड १९४ मधील सर्व रहिवाशी या संकटकाळात एकत्र होतो आणि आहोत.
या काळात दोन वेळेस मला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे कोरोना बाधितांच्या वेदना मी समजुन घेऊ शकलो. आज मागे वळुन पाहताना कोरोनामुळे आपण आपल्या वॉर्डमधील काही रहिवासी, शिवसैनिक व पदाधिकारी यांना गमावल्याचे दु:ख नजरेसमोर येते आणि डोळे भरून येतात. या सर्वांना भावपूर्ण आश्रुंजली…! दुर्दैवाने ज्या घरांमधील कमावता आधार काळाने ओढुन घेतला, त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. गेलेल्या व्यक्तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही, परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी मी घेतली आहे आणि ती समर्थपणे पेलत आहे.
मुंबई महापालिकेतील कामकाजाचे दरवर्षी सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशन २०१७ – २१ च्या अहवालानुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांत मला ‘रौप्य मानांकन’ अर्थात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ही प्रभागातील जनतेकरिता, मुंबईकरांकरिता केलेल्या कामाची पोचपावती… हे यश माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना सविनय अर्पण…! उपरोक्त कर्तव्यभावनेतुन करित असलेल्या कार्यांमागे ज्येष्ठांचे आशीर्वाद, सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, स्थानीय लोकाधिकार समिती, अंगिकृत संघटना, स्थानिक सामाजिक संघटना, प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शिवसैनिकांची मोलाची साथ तसेच प्रभागातील नागरिकांचे भरीव सहकार्य मला सदैव लाभले, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आपली भेट निवडणूक ते निवडणूक नसुन नियमित आहे, ‘नगरसेवक आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे आपण संपर्कात असतोच परंतु दिल्या शब्दांची पूर्ती आणि त्याप्रती उत्तरदायित्व ही शिवसेनेची शिस्त… यास्तव गत ५ वर्षांच्या काळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करित आहे.
निवडणूकीत दिलेली आश्वासने व सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील होतो आणि आहे. यापूढे देखील शिवसेनेच्या समाजसेवेच्या व्रताचा वसा जपण्यास्तव मी कटीबद्ध आहे. आगामी काळात आपला स्नेह असाच लाभु द्या जेणेकरुन प्रभागाच्या उन्नतीसाठी मला अधिक बळ मिळेल. यापूढील प्रभागाच्या प्रगतीपथावर आपण माझ्या पाठीशी नव्हे तर सोबत रहा, ही नम्र प्रार्थना!
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
आपला कृपाभिलाषी,
समाधान सदा सरवणकर,
नगरसेवक